माशीमार कसे ओळखावे: लाल छातीचा माशीमार (Red-breasted Flycatcher), लाल-कंठाचा माशीमार (Taiga Flycatcher) आणि काश्मिरी माशीमार (Kashmir Flycatcher)
इंग्रजीत प्रकाशीत झालेल्या मूळ लेखाचा हा मराठी अनुवाद आहे. लेखक : तरुण मेनन आणि अश्विन विश्वनाथन, अनुवादक : स्वरूप पाटणकर
लाल-छातीचा,लाल-कंठाचा आणि काश्मिरी माशीमार ह्या तीन खूप एकसारख्या दिसणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती फिसेडूला (Ficedula) ह्या पोटजातीत आढळतात. सुरुवातीला हे तिन्हीही पक्षी लाल छातीचा माशीमार ह्या पक्ष्याच्या उप-प्रजाती समजल्या जायच्या. परंतु आण्विक अभ्यासातून असे समजले आहे की ह्या तिन्ही वेगवेगळ्या पण एकाच प्रजातीतून वेगळ्या झालेल्या प्रजाती आहेत. ह्या तिन्ही प्रजाती त्यांच्याशी साम्य असणाऱ्या तपकिरी माशीमार (Asian Brown Flycatcher) आणि तपकिरी-छातीचा माशीमार (Brown-breasted flycatcher) ह्यांच्यापासून वेगळ्या ओळखण्याची खूण म्हणजे त्यांच्या काळ्या शेपटीच्या दोन्ही बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कडा आणि त्यांची वारंवार शेपटी उडवायची सवय. परंतु तुम्हाला समजलेच असेल कि ह्या तिन्ही मधला फरक ओळखणे बरेच अवघड आहे. वयात आलेला नर ओळखणे तसे सोपे आहे पण मादी आणि किशोरवयीन पक्षी ह्यांच्यातील फरक ओळखणे अवघड आहे.
लाल-कंठाचा माशीमार हा तिन्ही प्रजातींमध्ये सामान्य असणारे शेपटी उडवणारे वर्तन दाखवताना.
भौगोलिक क्षेत्र
लाल छातीचे माशीमार हे पूर्व युरोप आणि पश्चिम आशिया खंडात प्रजनन करतात, लाल कंठाचे माशीमार हे मध्य आणि पूर्व आशिया खंडात प्रजनन करतात तर काश्मिरी माशीमार ह्यांच्या प्रजनन करण्याच्या जागा ह्या पश्चिम हिमालय आणि ईशान्य पाकिस्तान येथे प्रतिबंधित आहेत. अशी विविध प्रजनन क्षेत्रे असूनही, ह्या तिन्ही प्रजाती ऑक्टोबर ते मार्च ह्या हिवाळी काळात भारताच्या द्वीपकल्प भागात एकत्र आढळतात, बऱ्याच वेळा एकाच परिसरात देखील आढळतात! खालील स्थलांतराचा नकाशा बघितलात तर तुम्हाला ह्या तिन्ही प्रजातींच्या प्रजननाचेआणि हिवाळी काळातील निवासस्थान ह्यातील फरक ठळक दिसेल. लाल-कंठाचा आणि लाल-छातीचा माशीमार ह्या दोघांचे द्वीपकल्प भारतातील अधिवास खूप एकसारखे आहेत,परंतु लाल कंठाचे माशीमार हे पूर्व आणि ईशान्य भारतात जास्त सहज आढळतात (लाल-छातीचा माशीमार ह्या भागात दुर्मिळ आहेत). लाल छातीचे माशीमार हे पश्चिम भारतात जास्त सहज आढळतात (लाल-कंठाचा माशीमारही येथे सहज आढळतात). काश्मिरी माशीमार ह्यांच्या स्तलांतराचा मार्ग उत्तर आणि मध्य भारतात असल्याने ते तेथे आढळू शकतात परंतु मुख्यतः हा पक्षी हिवाळ्यात निलगिरीतील उंच डोंगराळ प्रदेशात (जिथे तिन्हीही प्रजाती आढळू शकतात) आणि श्रीलंकेत आढळतो. जर तुम्हाला ह्या तिन्ही पैकी कोणी पश्चिम बंगाल च्या उत्तरेला दिसला तर तो नक्कीच लाल-कंठाचा माशीमार असणार आणि जर विणीच्या हंगामात काश्मीर मध्ये दिसला तर तो नक्कीच काश्मिरी माशीमार असणार.
लाल-छातीचा,लाल-कंठाचा माशीमारांचा स्थलांतराचा नकाशा
काश्मिरी माशीमारांचा स्थलांतराचा नकाशा
ओळख: लाल छातीचा माशीमार आणि लाल कंठाचा माशीमार ह्यांतील फरक कसा ओळखावा
चोच:
लाल-कंठाच्या माशीमारांची चोच पूर्णतः गडद रंगाची असते. लाल-छातीच्या माशीमारांची चोच मात्र पूर्ण गडद (लाल कंठाच्या माशीमारांसारखी) ते अंशतः फिक्या रंगाची दिसू शकते.
पिसारा:
प्रजननासाठी तयार असलेले नर ह्यांतील फरक कंठ आणि छातीवरील लाल रंगावरून सहज ओळखता येतो. लाल-कंठाच्या माशीमाराच्या कंठावरील रंग किंचित गडद लाल असतो जो फक्त त्याच्या कंठापुरता सीमित असतो. कधी कधी हा लाल रंग त्याच्या पिवळसर पांढऱ्या पोटापासून एका राखाडी रंगाच्या पट्ट्याने भिन्न झालेला दिसतो, मात्र हा पट्टा नेहमीच दिसेल असे नाही. लाल-छातीच्या माशीमाराच्या छातीवरील रंग हा पूर्ण छातीभर असतो जो त्याच्या पांढऱ्या पोटापरेंत पसरलेला असतो.
विणीचा हंगाम नसताना लाल-छातीच्या माशीमाराच्या छाती आणि कंठावर कमी जास्त प्रमाणात लाल रंग राहतो मात्र लाल-कंठाचा माशीमार त्याच्या कंठावरील रंग पूर्णपणे गमावतो. अश्या स्थितीतील लाल-छातीचा माशीमार हा थोडाफार विणीच्या हंगामातील लाल-कंठाच्या माशीमारसारखा दिसू शकतो पण हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की विणीचा हंगाम नसतानाच्या लाल-कंठाचा माशीमारच्या नराच्या कंठावरील लाल रंग हा पूर्णपणे नाहीसा होतो ज्यामुळे तो त्याच्या मादी सारखा दिसू शकतो! नरांच्या कंठावरील लाल रंग हा सहसा फेब्रुवारी मध्ये प्रजननापूर्वी असलेल्या पिसे टाकण्याच्या काळात (Moulting) विकसित होतो. जर तुम्हाला ऑक्टोबर ते जानेवारी ह्या काळात असा लाल-कंठाच्या माशीमारसारखा दिसणारा पक्षी दिसला तर तो नक्कीच लाल-छातीचा माशीमार असणार, जरी त्याच्या छातीवरील लाल रंग अर्धवट असला तरी! याव्यतिरिक्त लाल-छातीच्या माशीमारामध्ये लाल-कंठाच्या माशीमारसारखा छातीवरील राखाडी पट्टा नसतो (परंतु हा पट्टा लाल कंठाच्या माशीमारामध्ये दर वेळी दिसेलच असे नाही).
लाल-कंठाचा माशीमार,
जर तुम्हाला ह्या तिन्ही पैकी एक पक्षी दिसला ज्याच्या छाती किंवा कंठावर लाल रंग नाहीये (ही लाल-कंठाच्या माशीमाराची मादी किंवा किशोरवयीन नर किंवा प्रजनन काळ नसतानाचा नर असू शकतो), तर त्याला ओळखायची महत्वाची खूण ही त्याच्या शेपटी आणि पाठ ह्यांच्या मधल्या भागातील सगळ्यात लांब पिसांमध्ये आहे (longest (central) upper tail coverts). ही पिसे शेपटीच्या तळाशी आणि पार्श्वभागाच्या खाली असतात. लाल-छातीच्या माशीमारामध्ये ही पिसे तपकिरी राखाडी रंगाची असतात जी सहसा शेपटीच्याच रंगाची किंवा शेपटी पेक्षा किंचित फिकी रंगाची असतात. लाल-कंठाच्या माशीमारामध्ये ही पिसे गडद काळ्या रंगाची असतात आणि शेपटी एवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त गडद रंगाची असतात.
वरची ओळ उजवीकडून घड्याळाच्या दिशेने फोटो सौजन्य : मित्तल गाला, संदीप दास, श्रीराम रेड्डी, रेणुका विजयराघवन, इयान बर्जेस, प्रियम चथोपाध्याय.
वरील फोटोमधील वरच्या आणि खालच्या पक्ष्यांमधल्या पाठ आणि शेपटीच्या मधल्या भागातील सगळ्यात लांब पिसांमधील फरक निरखून पहा. तुम्हाला दिसेल की लाल-छातीच्या माशीमाराची (वरील ओळ) पिसे तपकिरी राखाडी रंगाची आहेत तर लाल-कंठाच्या माशीमाराची (खालील ओळ) पिसे गडद काळ्या रंगाची आहेत. अजून एक महत्वाची टीप म्हणजे वरील फोटोंमध्ये सगळ्या लाल-कंठाच्या माशीमारांची चोच ही गडद रंगाची आहे पण सगळ्या लाल-छातीच्या माशीमारांची चोच ही फिक्या रंगाची नाहीये.
टीप: काही अधिक खुणा ज्या कधी कधी मादी ओळखण्यासाठी बघितल्या जातात त्या ह्या लेखातून वगळल्या आहेत कारण ह्या खुणा खूपच सूक्ष्म असतात आणि प्रकाशावर अवलंबून असतात.
साद:
आवाजावरून दोन्ही पक्ष्यांच्या प्रजातींतील फरक स्पष्टपणे कळतो. दोन्ही प्रजाती ह्या हिवाळ्यात मुख्यतः त्यांची शेपटी उडवत साद देतात. कदाचित दुसऱ्या पक्ष्यांपासून त्यांच्या हिवाळी प्रदेशाचे (winter territory) रक्षण करण्यासाठी ते हे करत असावेत. दोन्ही पक्ष्यांची साद ही खुळखुळणारी (rattle)असते. लाल-छातीच्या माशीमाराची साद ही “तर्रर्रर्रर्रर्र” (trrrr) अशी असते ज्याच्यातील प्रत्येक स्वर कानाला स्पष्टपणे वेगळा ऐकू येतो. ह्याच्या तुलनेत लाल-कंठाच्या माशीमाराची साद जास्त जलद असते आणि अविरत “डर्रर्रर्रर्रर्रट” (drrrrt) अशी ऐकू येऊ शकते. ह्या सादेतील स्वर कानाला स्पष्टपणे वेगळे ऐकू येतीलच असे नाही. खाली दिलेली ध्वनी मुद्रित केलेली साद आणि ध्वनी आलेख (spectrogram) ऐकून तुम्हाला दोन्हीतील फरक अधिक नीट समजेल. प्रत्येक स्वरामधील अंतराकडे विशेष लक्ष द्यावे.
दोन्ही प्रजाती अजून काही प्रकारचे आवाज काढतात, विशेषतः “टीक“(tik) असा आवाज आणि कधी कधी खारीसारखा “चीप “(cheep).
काश्मिरी माशीमार
चोच:
काश्मीरी माशीमाराची चोच ही बहुतांश वेळा गडद रंगाची असते आणि चोचीच्या खालच्या भागावर विसृत पिवळा/पिवळसर रंग असतो. परंतु,लक्षात ठेवण्याची टीप ही की चोचीचा रंग हा पूर्णपणे गडद ते पूर्णपणे पिवळसर असा दिसू शकतो. प्रौढ नरांमध्ये बऱ्याच वेळेला अशी भिन्न पिवळसर चोच दिसते.
पिसारा:
काश्मिरी माशीमाराच्या कंठ आणि छातीवरील लालसर तपकिरी रंग हा लाल कंठाचा माशीमार आणि लाल छातीचा माशीमार ह्यांच्या तुलनेत जास्त विस्तृत असतो आणि त्याच्या गालावरती ठळक काळी रेष असते जी छातीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचते. प्रौढ मादी ही फिक्या तपकिरी रंगाची असते आणि सामान्यतः तिच्या छातीवर लालसर-तपकिरी रंग असतो (कधी कधी हा खवल्यांसारखा किंवा रेषांसारखा दिसतो) जो बऱ्याच वेळा पोटाच्या तळापाशी आणि अंगाच्या दोन्ही बाजूंपर्यंत पोहोचतो. किशोरवयीन नरांमध्ये विविध प्रकारचा पिसारा दिसू शकतो ज्यांमध्ये काहींचा पिसारा अगदी मादी सारखा दिसतो तर काहींच्या कंठावर, प्रौढ नरांप्रमाणे, कमी जास्त प्रमाणात लालसर तपकिरी रंग आढळतो.
टीप: काश्मिरी माशीमार ह्यांच्या किशोरवयीन नरांमध्ये कधी कधी गालावर ठळक काळी रेष नसते तर त्यांच्या पोटावरील लालसर-तपकिरी रंगाला राखाडी रंगाची सीमारेषा दिसू शकते ज्याने ते लाल छातीच्या माशीमारासारखे दिसू शकतात. मात्र काश्मिरी माशीमारामध्ये पोटावरील लालसर तपकिरी रंग हा लाल छातीच्या माशीमारापेक्षा जास्त विसृत असतो.
विणीच्या हंगामातील प्रजननासाठी तयार असलेला काश्मिरी माशीमार
काश्मिरी माशीमाराच्या मादीची शेपटी आणि पाठ ह्यांच्यामधील भाग (upper tail coverts) हा गडद रंगाचा असतो जो तिच्या शेपटीशी एकसंध असतो (लाल कंठाच्या माशीमारासारखा) आणि तिच्या छातीवर कधी कधी लालसर तपकिरी रंग दिसतो.
ह्या काश्मिरी माशीमाराच्या छातीवरील लालसर तपकिरी रंग निरखून पहा
साद:
आधी सांगितल्याप्रमाणे, काश्मिरी माशीमाराची खुळखुळणारी (rattle)साद ही लाल छातीच्या माशीमाराशी अगदी तंतोतंत जुळणारी असते. काश्मिरी माशीमारामध्ये एक विशिष्ट “ईप ईप” (eep eep) अशी साद देखील असते जी निसर्गामध्ये लाल छातीच्या माशीमाराच्या “त्सीप त्सीप” (tseep tseep) ह्या सादेशी अगदी तंतोतंत जुळते. ही ध्वनी आलेखद्वारे (spectrogram) वेगळी ओळखता येऊ शकते. काश्मिरी माशीमाराच्या सादेमध्ये एक वरच्या पट्टीतील स्वर असतो जो लाल-छातीच्या माशीमारामध्ये आढळत नाही.
वर्तन:
काश्मीरी माशीमार कधी कधी शेपटी उडवण्यासोबत शेपटीचा पंखा देखील करतात. हे वर्तन बाकीच्या दोन्ही माशीमारांमध्ये सहसा दिसत नाही. जर तुम्हाला एखादा माशीमार दिसला जो पुन्हा पुन्हा शेपटीचा पंखा करत असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. कदाचित तो दुर्मिळ काश्मिरी माशीमार असेल!
काश्मिरी माशीमार शेपटीचा पंखा करत असताना. छायाचित्र सौ. प्रतिक कामू
निष्कर्ष:
ह्या लेखामध्ये तिन्ही माशीमार ओळखण्याची मुख्य लक्षणे देण्यात आली आहेत. परंतु हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ह्यातील बऱ्याच लक्षणांना वेगवेगळे बघितले तर ते ओळख पटण्यासाठी अपुरे पडतात. ह्या तिन्ही माशीमारांच्या प्रजातींतील फरक ओळखण्यासाठी बहुतांश वेळा दोन तीन लक्षणांचे संयोजन दिसणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एक गडद रंगाची चोच असलेली माशीमाराची मादी ही तिन्ही पैकी कोणतीही असू शकते. परंतु जर तुम्हाला गडद चोच, शेपटी आणि पाठीच्या मधल्या भागातील गडद रंगाची पिसे दिसली आणि “डर्रर्रर्रर्रर्रट” (drrrt) (ज्यातील प्रत्येक स्वर वेगळा ऐकू येत नसेल) अशी साद जर ती देत असेल तर ती नक्कीच लाल-कंठाच्या माशीमाराची मादी असणार! आपल्याला आता हे माहित आहे की फिसेडूला (Ficedula) पोटजातीतील माशीमार हे खूप चंचल असतात. त्यामुळे दर वेळी नैसर्गिक अधिवासात ही सगळी लक्षणे दिसणे कठीण आहे. कधी कधी तुम्हाला पक्षाची फक्त एक झलक दिसू शकते. अशा वेळेला त्या पक्षाला तुम्ही तात्पुरता लाल- छातीचा/ लाल-कंठाचा माशीमार किंवा फिसेडूला (Ficedula) पोटजातीचा मशीमार असे संबोधू शकता आणि पुढच्या वेळी बाकीची लक्षणे शोधू शकता.
चला तर मग, आता हे माशीमार शोधूया!!
शिर्षक छायाचित्र: लाल-छातीचा माशीमार. © फरिद मोहम्मद/ मॅकॉले लायब्ररी.
खूपच उपयुक्त .तिघांचे तपशील एकाच वेळेस त्यामुळं त्यातील फरक ओळखण्यात नक्कीच मदत होणार .मराठीत दिली त्याबद्दल खूप धन्यवाद !