June 4, 2021

Lockdown Birding Diaries— In Quest of A Heron

This is a guest post by Ramesh Shenai. As a naturalist by profession, he has lead many tours to premier wildlife destinations across India.  Other than birding and photography, he also enjoys writing about the natural world. His stories can be viewed on his blog.


वंचकापासून वंचित 

२०२० च्या मार्च महिन्या अखेरीस कोरोनाची चाहूल लागली आणि लॉकडाऊन घोषित झाला. मला सर्वात जास्त वाईट वाटत होतं ते हे, की मला आता पक्षी बघण्यासाठी कुठेही जाता येणार नव्हतं. आता जे काय पक्षी बघायचे होते ते २ बाय ४ च्या खिडकीतून.

मी विचार करायचो की काँक्रिटच्या या जंगलात एवढ्याश्या खिडकीतून मला कितीसे ते पक्षी दिसणार? आणि दिसले तरी मी किती दिवस हे चालू ठेवणार? पण माझ्या विचारांमध्ये खंड पडायला बिलकुल वेळ नाही गेला. पहिल्याच दिवशी मला १६ प्रकारचे वेगवेगळे पक्षी दिसले आणि माझा उत्साह अगदी दुप्पट झाला. तसे ते साधारण पक्षीच होते पण मला वाटलं की फार फारतर कावळा, चिमणी, मैना यांच्यासारखे ५-६ प्रकारचे पक्षी मला दिसतील. हळूहळू एकाचे दोन, दोनाचे चार दिवस करता करता मी दोन महिने न चुकता रोज खिडकीतून पक्षीनिरीक्षण करण्यात यश मिळवले. ह्या दरम्यान कधी कधी असं वाटू लागायचं की बस, आता नविन काही दिसणार नाही पण तेव्हाच कोणी नविन पक्षी माझ्या समोर यायचा आणि मग काय, माझी बॅटरी एकदम रीचार्ज!

जसं की त्या पक्ष्यांना सुद्धा कळून चुकलं होतं की काही दिवस मी बाहेर पडणार नाही म्हणूनच त्यांनीच माझी खिडकी शोधून काढली. कारण हळूहळू खिडकीतून दिसणाऱ्या पक्ष्यांची यादी वाढतच चालली होती. त्यात सुतुंग (Booted Eagle), बहिरी ससाणा (Peregrine Falcon), किरमिजी सुर्यपक्षी (Vigors’s sunbird) आणि चक्क मी वसईत कधीही न पाहिलेली जंगल मैनाही (Jungle Myna) माझ्या भेटीला येऊन गेली !

नेहेमी दिसणारे आणि क्वचित दिसणारे असे बरेच पक्षी रोज दिसत असताना एक पक्षी मात्र हरवला होता, तो म्हणजे वंचक (Indian Pond-Heron). सर्वत्र सहजपणे दिसणारा हा पक्षी काही नजरेस येत नव्हता. कधी फील्डवर कोणी हा पक्षी दाखवला तर “अरे सोड रे, हा पांडू आहे, त्याला काय बघायचं?” असं म्हणुन आम्ही पुढे सरकायचो. कदाचित आमच्या या अश्या वागण्याचा त्याला रागच आला होता जणू, म्हणुन हा भामटा मला भेटायला येत नव्हता. रोज पक्षी बघतांना आज दिसेल उद्या दिसेल अशीच आशा ठेवत होतो. ” ह्या पुढे तुझ्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही, पण बाबा दर्शन दे “, असं देखील मी मनाशी बोलायचो. दोन तीन वेळा हा वंचक डोक्यावरून गेल्यासारखं वाटलं सुद्धा पण नीटसा न दिसल्याने खात्री करता नाही आली आणि शोध पुढे चालूच राहिला.

नेहमीप्रमाणे परवाही सकाळी खिडकीत बसलो. “निसर्ग” राव (read cyclone Nisarga ) कधीही येऊन धडकणार होते त्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण आणि अंधार झाला होता. त्यातही नेहेमीच्या काही पक्ष्यांनी हजेरी लावल्यानंतर अचानक आकाशात एक पक्षी आरामात उडत येताना दिसला. घाईघाईत खूप आशेने दुर्बीण डोळ्याला लावून त्याच्यावर नेम धरला आणि त्याला पाहून एक क्षणासाठी मी पुरता स्तब्ध झालो. ६७ दिवस वाट पाहून, तब्बल ५९ प्रकारचे पक्षी पाहून सुद्धा मला वंचित ठेवून या वंचकाने अखेर मला दर्शन दिले होते. मनापासून खूप वाट पाहत होतो आणि असा अचानक त्याला समोर आलेला पाहून माझा आनंद दहा पटींनी वाढला होता. दरवेळी ज्याच्याकडे दुर्लक्ष करायचो तो पठ्ठ्या आज माझ्या समोर होता आणि स्वतःची किंमत मला दाखवून देत डोक्यावरून निघून गेला. तेव्हाच ठरवलं कि यापुढे हा ‘पांडू’ माझ्याकडून कधी दुर्लक्षित होणार नाही.

लॉकडाऊन च्या नैराश्येत सुद्धा आशेचा किरण देणारा हा प्रसंग घडला आणि २ बाय ४ च्या खिडकीतून घडणारं माझं पक्षी निरीक्षण खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं.


Header Image: Vigors’s Sunbird Aethopyga vigorsii by Ramesh Shenai/ Macaulay Library

Subscribe
Notify of
guest

4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
PRADIP PATIL
PRADIP PATIL
3 years ago

“न लगे सायास l जावे वनांतरा l
सुखे येतो घरा l नारायण ll ” ह्या तुकोबांच्या ओळींचा तुमचा हा छोटेखानी लेख प्रत्यय देतो.तुमच्यासारख्या अभ्यासू निसर्गवाचकाने असे लेखन करत राहिले पाहिजे. त्याचा उपयोग आमच्यासारख्या जिज्ञासूंना नक्कीच होत राहील.

Prabhakar Shridhar Barbadikar
Prabhakar Shridhar Barbadikar
3 years ago

खूप छान लिहिलंय, पक्षी निरीक्षण हा एक छंद आहे,तु त्याची कलाकृती केलीस, भाषाशैली उत्तम आहे, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Gayatri Kolwankar
Gayatri Kolwankar
3 years ago

What a fantastic article… Ur article has taught us that, when there is a will, there is a way!! Great observation, all the birds. Keep writing n share ur experience. All d best.

Renuka
Renuka
3 years ago

दादा खुप मस्त वर्णन. कशी असते ना निसर्गाची किमया? त्या पांडू रावांचे महत्त्व समजायला lockdown चे निमित्त होते तर.

More Reads

My Healing Journey with Birds

My Healing Journey with Birds

Amid a personal struggle with mental health, Nidhi Solanki found unexpected solace in birdwatching. In this blog, she shares how the simple act of observing birds helped her reconnect with herself and find peace during a difficult time